सोमवार, १६ जुलै, २०१२


आरोग्य फुफ्फुसांचे
डॉ. श्री. बालाजी तांबे
Friday, July 06, 2012 AT 01:30 AM (IST)

रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या आणि श्‍वासोच्छ्वासामार्फत संपूर्ण शरीराला प्राणशक्‍तीचा पुरवठा करणाऱ्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी काळजी घ्यायलाच हवी. 

श्‍वासोच्छ्वासाद्वारे शरीराला प्राणवायूचा व प्राणशक्‍तीचा पुरवठा करण्याच्या कार्यात फुफ्फुसांचे योगदान महत्त्वाचे असते. छातीमध्ये हृदयाच्या दोन्ही बाजूला दोन फुफ्फुसे असतात. फुफ्फुसे एखाद्या स्पंजाप्रमाणे असतात. श्‍वास घेताना आणि सोडताना प्रसारित व आकुंचित होत असतात.
\
श्‍वास घेणे व सोडणे ही क्रिया इतक्‍या स्वाभाविकपणे घडते, की मुद्दाम लक्ष दिल्याशिवाय तिची आपल्याला जाणीवही होत नाही. मात्र सर्दी झाली व नाक बंद पडले किंवा खोकला झाला, ठसका लागला, उचकी लागली की मग मात्र श्‍वासाची जाणीव होते. दम्यासारख्या विकारात किंवा हृदरोगामुळे श्‍वास घ्यायला त्रास होतो तेव्हा तर जीव अक्षरशः कासावीस होऊ शकतो. प्राणावर बेतते की काय असे वाटू शकते. म्हणूनच रात्रंदिवस कार्यरत असणाऱ्या आणि श्‍वासोच्छ्वासामार्फत संपूर्ण शरीराला प्राणशक्‍तीचा पुरवठा करणाऱ्या फुफ्फुसांचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यासाठी काळजी घ्यायलाच हवी.

रक्‍तफेसापासून फुफ्फुसे
गर्भशरीरात फुफ्फुसे असली तरी गर्भ श्‍वास घेत-सोडत नसतो. जन्माला आल्यावरच बाळ पहिला श्‍वास घेते आणि श्‍वसनाची क्रिया सुरू होते. फुफ्फुसे पूर्णतः तयार होण्याची प्रक्रिया साधारणपणे मूल आठ वर्षांचे होईपर्यंत चालू असते. म्हणून लहान मुलांच्या फुफ्फुसांना अधिक जपावे लागते.
गर्भशरीरात फुफ्फुसे कशी तयार होतात हे आयुर्वेदाने याप्रमाणे सांगितले आहे-

असौ शोणित फेन प्रभवः ।... सुश्रुत शारीरस्थान
म्हणजे रक्‍ताच्या फेसापासून फुफ्फुसे तयार होतात.

प्रत्यक्षातही रक्‍तधातूचा आणि फुफ्फुसांचा संबंध खूप जवळचा असल्याचे दिसते. रक्‍तधातूतील दोष बरा न करता नुसताच दबवण्याचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम फुफ्फुसांवर होतो आणि फुफ्फुसांमधला दोष दाबण्याचा प्रयत्न केला तर रक्‍तात दोष, म्हणजे त्वचारोग होणे, त्वचा काळवंडणे यासारखे त्रास होताना दिसतात.

याचा अनुभव दम्याच्या रुग्णांमध्ये हमखास येतो.
फुफ्फुसांचा संबंध रक्‍ताशी असतो तसाच वाताशी आणि कफाशीही असतो. उरस्थान अर्थात छाती हे कफाचे स्थान असते. त्यामुळे फुफ्फुसांवर कफाचा मुख्य प्रभाव असतोच. हवा आत घेणे, बाहेर सोडणे ही क्रिया सातत्याने होत असल्याने फुफ्फुसांचा वाताशीही संबंध असतो. वाताच्या पाच प्रकारांतील प्राण व उदान यांचा फुफ्फुसांशी विशेष संबंध असतो. फुफ्फुसांचे आरोग्य कायम ठेवायचे असेल तर या सर्व शरीरतत्त्वांचे संतुलन सांभाळणे आवश्‍यक असते. याशिवाय हवेतील वाढते प्रदूषण, धूम्रपानाचे व्यसन, धूळ-धुराचा सतत संपर्क, शुद्ध हवेचा अभाव, खोकला-सायन्युसायटिस, दमा वगैरे विकारांवर केवळ लक्षणे कमी करणारे उपचार घेण्याची प्रवृत्ती, खाण्या-पिण्याच्या अयोग्य सवयी वगैरे अनेक फुफ्फुसांना घातक ठरणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे गरजेचे असते.

लक्षणांवर लक्ष ठेवा
फुफ्फुसांचे आरोग्य बिघडते आहे हे पुढील लक्षणांवरून लक्षात येते-

वारंवार खोकला होणे, एकदा खोकला झाला की तो बरा होण्यास बराच अवधी लागणे.
बोलताना, चालताना दम लागणे; जिने चढणे, पळणे वगैरे क्रिया करणे अवघड वाटणे.
दीर्घ श्‍वास घेणे अवघड वाटणे, वरवर श्‍वास घेण्याची सवय लागणे, बोलताना किंवा श्‍लोक वगैरे म्हणताना श्‍वास अपुरा पडतो आहे असे वाटणे.
यापैकी कोणतीही लक्षणे दिसत असली किंवा फुफ्फुसांचे आरोग्य बिघडविणाऱ्या पूर्वी उल्लेख केलेल्या कारणांशी संबंध असला तर तातडीने फुफ्फुसांची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

करण्याजोगे काही
फुफ्फुसांसाठी हितावह; खोकला, दमा, सायनस, ऍलर्जी वगैरे त्रासांना दूर ठेवणाऱ्या किंवा हे त्रास होत असल्यास ते बरे होण्यास मदत करणाऱ्या नित्य परिचयाच्या काही गोष्टी पुढीलप्रमाणे सांगता येतील.

आले - सुंठ-आले किंवा सुंठ फुफ्फुसांसाठी अतिशय चांगले होय. खोकल्याची ढास कमी होण्यासाठी सुंठ उगाळून तयार केलेल्या चाटणात खडीसाखर घालून, शिजवून केलेला पाक थोडा थोडा चाटण्याने लगेच बरे वाटते. वारंवार सर्दी-खोकला होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी, दम्याचा त्रास असणाऱ्यांनी सुंठीचा तुकडा टाकून उकळलेले पाणी पिणेसुद्धा उपयुक्‍त असते. दम लागण्यास सुरवात झाल्यास लगेचच आल्याचा रस व मध यांचे चाटण चाटण्याने बरे वाटते. स्वयंपाकात मिरचीऐवजी आल्याचा अधिक वापर करणे हेही फुफ्फुसांसाठी हितावह असते.

ओवा - ओवा, ज्येष्ठमध, तीळ एकत्र करून तयार केलेली सुपारी जेवणानंतर खाण्याने फुफ्फुसांची ताकद वाढते व खोकला वगैरे त्रास होण्यास प्रतिबंध होतो. विड्याच्या पानात इतर जिन्नसांसह थोडा ओवा टाकून खाणे फुफ्फुसांच्या आरोग्यासाठी चांगले असते.

गवती चहा - गवती चहा, ज्येष्ठमध, दालचिनी, तुळस, पुदिना यांचा काढा थोडीशी साखर टाकून पिण्याने सर्दी, खोकला, ताप कमी होतो; श्‍वासाशी संबंधित त्रास सहसा होत नाहीत.

तुळस - तुळशीच्या पानांमध्ये हवा शुद्ध करण्याचा गुणधर्म असतो. त्यामुळे घराजवळ, अंगणात तुळस असणे चांगले असते. तुळशीचा रस खडीसाखर टाकून थोडा थोडा घेतल्यास छातीत भरलेला कफ सुटण्यास मदत होते. तुळशीची पाने चावून खाणेसुद्धा श्‍वसनाच्या आरोग्यासाठी चांगले असते.

लवंग - लवंग दम्यासाठी औषधाप्रमाणे उपयोगी असते. लवंग चघळण्याने दम लागत नाही, ठसका लागून खोकला येणे बंद होते.

ज्येष्ठमध - हे फुफ्फुसांसाठी उत्कृष्ट औषध होय. नुसत्या ज्येष्ठमधाचा काढा घेता येतो किंवा ज्येष्ठमध, पिकलेले अडुळशाचे पान आणि एक बेहडा यांचा काढा घेण्याने खोकला बरा होतो.

रुईची पाने - रुईच्या पानांनी छातीवर शेक करणे हे श्‍वसनसंस्थेसाठी उत्तम असते. छातीत कफ भरला असता, दम लागत असता अगोदर छातीला तेल लावून वरून रुईच्या पानांनी शेक केल्यास वात-कफ दोष संतुलित होतात व लगेच बरे वाटते.

मध - मध हे तर कफदोषावरचे उत्कृष्ट असे औषध आहे. तसेच उत्तम प्रतीच्या शुद्ध मधामुळे रोगप्रतिकारशक्‍ती वाढण्यास मदत मिळते, फुफ्फुसांची ताकदही वाढते. रोज एक-दोन चमचे शुद्ध मध खाणे फुफ्फुसांसाठी उत्तम होय.

स्वयंपाकघरातील मिरी, जायपत्री, तमालपत्र, हळद, लवंग, वेलची, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थही फुफ्फुसांसाठी चांगले असतात. स्वयंपाक करताना नुसतेच तिखट न वापरता या सर्व पदार्थांचा योग्य प्रमाणात वापर केला, तर त्यामुळे अन्न चविष्ट तर होतेच, बरोबरीने श्‍वसनसंस्थेची कार्यक्षमताही चांगली राहते.

सेवन रसायनांचे
फुफ्फुसांसाठी उपयुक्‍त औषधी द्रव्यांपासून अनेक रसायनेही बनवली जातात. च्यवनप्राश, संतुलन आत्मप्राश, सॅनरोझ, श्‍वासकासचिंतामणी वगैरे अनेक रसायने फुफ्फुसांचे आरोग्य, पर्यायाने संपूर्ण शरीराचे आरोग्य रक्षण करणारी आहेत. भविष्यात काहीही त्रास होऊ नये आणि कार्यक्षमता कमी न होता स्फूर्ती, उत्साह कायम राहावा यासाठी अशा रसायनांचे नियमित सेवन करणे उत्तम असते.

याचबरोबर फुफ्फुसे आणि संपूर्ण श्‍वसनसंस्थेचे आरोग्य नीट राहावे, संपूर्ण शरीराला पुरेपूर प्रमाणात प्राणशक्‍ती मिळावी यासाठी प्राणायामादी श्‍वसनक्रिया, ॐकार गूंजन, दीर्घश्‍वसन सर्वोत्तम असते. प्राणादी पंचवायूंनी आपापली कामे व्यवस्थित करण्यासाठी, हृदय, मेंदू व शरीरातील इतर महत्त्वाच्या अवयवांना पुरेशी प्राणशक्‍ती मिळण्यासाठी, रक्‍ताभिसरण व्यवस्थित होण्यासाठी, प्रदूषणामुळे शरीरात जाणाऱ्या विषद्रव्यांना शरीरात थारा न मिळण्यासाठी प्राणायामादी श्‍वसनक्रियांचा नियमित अभ्यास करणे सर्वोत्तम होय.

ॐकार गूंजन, संगीतसाधना, हवा फुंकून वाजविले जाणारे शंख, भेरी, बासरीसारखे वाद्य वाजवणे, दीर्घश्‍वसन हे सर्व प्राणायामाचेच सोपे प्रकार असतात. प्राणायाम हा प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली शिकणे आवश्‍यक असते. ॐकार गूंजन, अनुलोम-विलोम, संतुलन भस्त्रिका वगैरे क्रिया शिकून घेऊन त्यांचा नियमाने अभ्यास करता येतो. "संतुलन क्रियायोग' पुस्तकात या विषयाची सविस्तर माहिती मिळू शकेल.